2017 साली घेतलेल्या स्टाफ सिलेक्शन परीक्षेचा निकाल जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2017 साली घेण्यात आलेल्या एसएससीचा निकाल तत्काळ जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्टाफ सिलेक्शन कमिशनला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

पेपरफुटीमुळे एसएससी परीक्षेचा निकाल न्यायालयाने रोखून धरला होता. विद्यार्थ्यांनीही पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करीत आंदोलन केले होते. या पेपरफुटीचा तपास दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रँच करीत असून या प्रकरणाशी संबंधित चार जणांना अटकही करण्यात आली आहे. नीरज शर्मा, अनुप राव, कुशल नेगी, दुरज अली अशी आरोपींची नावे आहेत.

अशी झाली कॉपी
स्टाफ सिलेक्शनची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला. कॉम्प्युटरमध्ये एक खास सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या मदतीने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाताच फक्त सिस्टम सुरू ठेवतात. विद्यार्थ्यांच्या समोरील ऑनलाइन प्रश्नपत्रिका बाहेरून भरण्यात आली. परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची भूमिका डमी उमेदवारासारखी असते. ज्या उमेदवारांच्या बाबतीत हा डमीचा प्रकार झाला आहे. त्या उमेदवारांकडून तब्बल 15 लाख रुपये घेऊन बाहेरून प्रश्नपत्रिका सोडविण्यात आली.