मतमोजणीत गडबड केली; मला मृत्युदंडाची शिक्षा द्या!

पाकिस्तानात नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. पंतप्रधान कोण होणार? यासाठी पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू असतानाच पाकिस्तानातील एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱयाने आपल्या पदाचा राजीनामा दिला. लियाकत अली चट्ठा असे या अधिकाऱयाचे नाव आहे. मी देशाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मी मतमोजणीत गडबड केली, मला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. या गडबड घोटाळ्यात सहभागी असणाऱया अन्य लोकांनाही शिक्षा झाली पाहिजे, असे सांगत लियाकत अली चट्ठा यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत मोठी गडबड करण्यात आली असून यात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य न्यायाधीश हेही सहभागी आहेत, असा गंभीर आरोप या निवडणूक अधिकाऱयाने केला आहे. रावळपिंडीचे निवडणूक आयुक्त लियाकत अली चट्ठा यांच्या या दाव्यामुळे जेलमध्ये बंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पार्टीने 8 फेब्रुवारीला झालेल्या मतमोजणीत मोठी गडबड केल्याचा आणि जनादेश चोरी झाल्याचा दावा करत पाकिस्तानात आंदोलन केले होते. याला आता बळ मिळाले आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये पत्रकारांशी बोलताना लियाकत अली चट्ठा यांनी सांगितले की, ज्या उमेदवाराचा पराभव होणार होता, त्यांना विजयी करण्यात आले. या सर्व चुकीच्या कामांची मी जबाबदारी घेत आहे. यात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य न्यायाधीश हे सहभागी आहेत. निवडणूक निकालात गडबड केल्याची जबाबदारी घेत लियाकत अली चट्ठा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, पाकिस्तान निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

– देशाच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळे मला रात्रीची झोपही येत नाही. माझ्यावर खूप दबाव होता. मी आत्महत्या करण्याचा विचारसुद्धा केला होता. परंतु मी हे सर्व जनतेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला. सर्व नोकरशहांना माझी विनंती आहे की, या सर्व राजकीय नेत्यांसाठी कोणतीही गोष्ट चुकीची करू नका, असे लियाकत अली चट्ठा यांनी आवाहन केले आहे.