
कोरोनामुळे देशभरात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली असून लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेले आहेत. यासर्व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
देशभरातील सर्व राज्य सरकारने येत्या काळात घरोघरी जाऊन शोधमोहीम सुरू करण्याची सूचना केली आहे. त्याशिवाय या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या, तर लाखो श्रमिक मजूर हे आपल्या मूळ गावी परतले. तर अनेकांवर पगारकपातीची पुऱहाड चालविण्यात आली, तर प्रत्यक्ष शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी आजही ऑनलाइन शिक्षणात सहभागी शकलेले नाहीत.
या सर्व कारणांमुळे देशभरात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. या वाढत्या संख्येबद्दल केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाने या सर्वाची गंभीर दखल घेत शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शाळेत पुन्हा दाखल करून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना राज्यांना केली आहे.
त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली आहे. या शोधमोहिमेत 6 ते 18 वर्षांचे किती विद्यार्थी सध्या शाळाबाह्य आहेत याची तपासणी राज्यांना करावी लागणार आहे.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच देशभरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या आहेत. या सूचना जाहीर करताना गुणवत्तापूर्वक शिक्षण कसे देता येईल यासाठी लक्ष देण्यात आले आहे.
कोरोनामुळे शिक्षणव्यवस्थेवरदेखील थेट फटका बसला असून त्यामुळे विद्यार्थी आणि शाळांना त्याचा कमीत कमी फटका बसावा यासाठी केंद्र सरकारने या नियमावलीत विशेष लक्ष दिले आहे.
























































