दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ, एससी-एसटी विद्यार्थ्यांना 24 टक्के अधिक शुल्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क 24 पटीने वाढवण्यात आले आहे. यापूर्वी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50 रुपये शुल्क द्यावे लागत होते ते आता 1200 रुपये करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा दुप्पट म्हणजेच दीड हजार रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी नववी आणि अकरावीमध्येच नोंदणी केली जाणार आहे. शाळांनी ही नोंदणी आधीच सुरू केली होती. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांकडून आता वाढीव शुल्क घेतले जाणार आहे. दिलेल्या मुदतीत त्यांनी ते वाढीव शुल्क भरले नाही तर त्यांना 2019-20 च्या परीक्षेला बसता येणार नाही. दहावी आणि बारावीसाठी परीक्षा शुल्क समान ठेवण्यात आले आहे.

अतिरिक्त विषय घेतल्यास अधिक शुल्क
अतिरिक्त विषय घेऊन बारावी परीक्षा देणाऱया अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नव्हते, परंतु आता त्यांना 300 रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. अशाच प्रकारे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयांसाठी 150 रुपयांऐवजी अतिरिक्त 300 रुपये भरावे लागणार आहेत. पूर्णतः दृष्टिहीन असलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क माफ करण्यात आले आहे.

परदेशातून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना दुप्पट शुल्क
परदेशातून सीबीएसई बोर्डामार्फत परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क दुप्पट आकारले जाणार आहे. पाच विषयांसाठी त्यांना 10 हजार रुपये शुल्क द्यावे लागेल. ते पूर्वी पाच हजार रुपये होते. बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयांसाठी एक हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये द्यावे लागतील.