शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज कधीपासून भरणार? अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला उशीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार, असा प्रश्न शाळांकडून केला जात आहे. राज्य परीक्षा परिषदेने 1 सप्टेंबरपासून शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात केली जाईल, असे परिपत्रक जाहीर केले होते. मात्र अद्याप परिषदेने ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही.

शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होता चालली आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासूनच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरुवात करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता, परंतु परीक्षा परिषदेचे आयुक्त व अध्यक्ष या दोन्ही पदांवर नवीन अधिकारी बदलून आले. त्यामुळे पूर्वी झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र 1 सप्टेंबरपासून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरुवात केली जाईल, असे परिपत्रक परीक्षा परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते, मात्र काही कारणांमुळे त्यास पुन्हा विलंब झाला आहे.

आज शुक्रवारी दुपारनंतर किंवा सोमवारपासून सर्वांना सुरळीतपणे अर्ज भरता येतील, असे परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, ग्रामीण व शहरी भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा द्यावी, शिष्यवृत्ती परीक्षेच्या घसरलेल्या निकालात सुधारणा व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारने शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ केली आहे.