
सामना ऑनलाईन । मुंबई
अंधश्रद्धा ही फक्त सामान्यांमध्येच नसते, तर बऱ्याचदा शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात, असं परखड मत अणु शास्त्रज्ञ आणि अणु उर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अंधश्रद्धा ही समाजाच्या आत रुतून बसलेली आहे. विविध सामाजिक स्तरांवर ती वेगवेगळ्या पद्धतीने पसरलेली आहे. त्याचा शिक्षण आणि सामाजिक सुधारणांशी थेट संबंध आहे, असं डॉ. काकोडकर यावेळी म्हणाले. 1990 साली गणपती बाप्पा दूध पितो, या पसरलेल्या अफवेची आठवण देताना काकोडकर यांनी सामान्यच कशाला पण शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात, असं मत व्यक्त केलं.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही गेली तीस वर्षं अव्याहतपणे अंधश्रद्धेचा नायनाट करण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे, असं म्हणत त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या या समितीविषयी गौरवोद्गार काढले.
























































