
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
क्रिकेट या खेळाला ज्या देशात सुरुवात झाली त्या इंग्लंडला रविवारी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी झालेल्या एक दिवसीय सामन्यात जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या स्कॉटलंडने सर्वांनाच चकीत करत क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. स्कॉटलंडने इंग्लंडचा ६ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला.
| Exclusive footage of the winning moment as Scotland create history by beating the @ICC number 1 team in ODI’s, England! #followscotland pic.twitter.com/jcqgY0Wtuk
— Cricket Scotland (@CricketScotland) June 10, 2018
स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या वेगवान माऱ्याचा खंबीरपणे सामना केला आणि ३७१ धावा कुटल्या. विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला दमदार सुरुवात मिळाली. इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी फक्त १२.३ षटकात १२९ धावांची भागीदारी केली. मार्क वॅटच्या गोलंदाजीवर जेसन रॉय ३४ धावा करून बाद झाला आणि इंग्लंडच्या सुसाट गाडीला ब्रेक लागला.
रॉय बाद झाल्यानंतर बेअरस्टो आणि हेल्सची जोडी जमली. ही जोडी मैदानात असेपर्यंत इंग्लंड आरामात विजय मिळवेल असे वाटत होते. परंतु १७ व्या षटकात बेअरस्टो बाद झाला आणि इंग्लंडचा संघ संकटात सापडला. बेअरस्टो याने ५९ चेंडूचा सामना करताना १०५ धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर हेल्स आणि रूट ही जोडी जमली असे वाटत असताना चोरटी धाव घेताना रूट २९ धावांवर बाद झाला. हेल्सने अर्धशतकीय खेळी करत एक बाजू लावून धरली, परंतु अर्धशतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने ५२ धावा केल्या. त्यानंतर मोईन अली (४६ धावा) आणि लियम प्लंकेट (नाबाद ४७ धावा) यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु इंग्लंडचा संपूर्ण संघ ४८.५ षटकात ३६५ धावांवर गारद झाला आणि स्कॉटलंडने ६ धावांनी सामना जिंकला.
Yes, that really did happen yesterday. What a support. One to remember. #followscotland pic.twitter.com/jIfmFIOFSR
— Cricket Scotland (@CricketScotland) June 11, 2018
कॅलम मॅकलियोडचे ऐतिहासिक शतक
त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने इंग्लंडच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. मॅथ्यू क्रॉस आणि कायले कॉट्झरने संघाला १०३ धावांची सलामी दिली. क्रॉस ४८ आणि कॉट्झर ५८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर कॅलम मॅकलियोडने चौफेर फटकेबाजी केली. कॅलमने अखेरपर्यंत नाबाद राहात १४० धावा केल्या. यात त्याच्या १६ चौकारांचा आणि ३ षटकारांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध शतक ठोकणारा कॅलम स्कॉटलंडचा पहिला खेळाडू ठरला. कॅलमसह जॉर्ज मुन्सीने ५५ धावांची खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या रचून दिली.
What an innings! for @calummacleod640 against @englandcricket! A special knock. #followscotland pic.twitter.com/Ii3pLedzHv
— Cricket Scotland (@CricketScotland) June 10, 2018






























































