
माहीम चौपाटीवर येणाऱया पर्यटकांना लवकरच माहीम बीचपासून व्हाया दादर-वरळीपर्यंत बोटीने सफर करता येणार आहे. शिवाय या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ‘सी फूड प्लाझा’वर लज्जतदार कोळी पदार्थांची लज्जत चाखता येणार आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी अनेक सुविधाही उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जी/उत्तरचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली. आगामी काळात परदेशी पर्यटकांनाही आकर्षण वाटणाऱया अत्याधुनिक सुविधा माहीम किल्ल्यासह चौपाटीवर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मुंबईतील कोळीवाडय़ाच्या ठिकाणी सुशोभीकरण करतानाच महिला बचतगट आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटीलगत सुरू करण्यात आला आहे. या सी फूड प्लाझाला प्रत्येक आठवडय़ाला सरासरी 500 जण भेट देत आहेत. 2 नोव्हेंबर 2023 रोजी शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत 30 हजार पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. पालिकेकडून या ठिकाणी दर्जेदार अन्नपदार्थ पुरवतानाच व्यवसायासाठी पूरक अशी साधनसामुग्री पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार पुरवण्यात आल्या आहेत.
अशा आहेत सुविधा
या ‘सी फूड प्लाझा’साठी आवश्यक दालन पालिकेकडून उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच टेबल, खुर्च्या, विद्युत रोषणाई, ओला आणि सुका कचरा संकलन डबे, ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी अॅप्रन, हातमोजे, हेडर क@प आदी बाबी पुरविण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक महिला बचतगटाच्या दालनावर त्यांचे माहिती फलक लावलेले असतात. नोंदणीकृत कोळी महिला बचतगटांना ‘सी फूड प्लाझा’मध्ये दालन उभारणी आणि संचलनाची परवानगी देण्यात आल्याची माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.



























































