श्रीलंकेत घरात हत्यारे ठेवायला बंदी, हत्यारे जमा करायला दोन दिवसांची मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलंबो

साखळी बॉम्बस्फोटांनंतर देशात यादवी माजू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना आखायला सुरुवात करण्यात आली असून या पुढे नागरिकांना घरात तलवार, चाकू, कोणतेही धारधार हत्यार आणि लष्करी गणवेशाशी मिळताजुळता गणवेश घरात ठेवायला आणि घालायला बंदी घालण्यात आली आहे. जवळच्या पोलीस ठाण्यात ही हत्यारे जमा करायला सांगण्यात आली असून त्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

दहशतवाद्यांविरोधात उघडलेल्या शोधमोहिमेदरम्यान अनेक मशिदी आणि घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात चाकू, तलवारी आणि इतर धारधार हत्यारे सापडली. यात अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. बॉम्बस्फोटांसंदर्भात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी शाळा उघडल्या
दोन आठवडय़ानंतर आज कोलंबोतील शाळा उघडल्या. मात्र, शाळेत कमी प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. शाळांना विशेष संरक्षण देण्यात आले होते. यात लष्कर, पोलीस, स्थानिक सुरक्षा अधिकारी, पालक आणि जुने विद्यार्थीही शाळेबाहेर मोठय़ा प्रमाणात जमा झाले होते. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये कमी विद्यार्थी आले होते. ख्रिश्चन समाजाकडून चालवल्या जाणाऱया शाळा मात्र बंदच होत्या.

मुस्लीम वस्त्यांवर हल्ले होऊ लागले
कोलंबोपासून जवळच असलेल्या नेगोंबो शहरातील पोरुथोटा गावात मुस्लीम दुकानावर ख्रिश्चन समाजाने हल्ला केला. या दुकानाची नासधूस करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीही मुस्लीम वस्तीवर हल्ला करण्यात आला आणि त्यांची वाहने जाळण्यात आली. या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुस्लीम वस्त्यांवर ख्रिश्चनांनी दगडफेक करून दुकानांची नासधूस केली.