
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या 5 मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा , तिचं शहर होणं , पांडीचेरी , राख आणि पल्याड या चित्रपटांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.
सदर 5 मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी 5 तज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज, एफटीआयआय चे धीरज मेश्राम, युनेस्को चे ज्युरी मनोज कदम, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता. या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे 25 चित्रपटांचे परीक्षण करत या 5 चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी याप्रमाणे 5 चित्रपटांचे 10 प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहेत.






























































