
केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांची जाहिरातबाजी करण्यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये उभारलेले सेल्फी पॉइंट औटघटकेचे ठरले आहेत. लाखो रुपये खर्चून उभारलेले हे सेल्फी पॉइंट महिनाभराच्या आधीच भंगारात गेले आहेत. त्यामुळे त्यावर रेल्वेने केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याची चर्चा रेल्वे अधिकाऱयांबरोबरच प्रवाशांमध्ये आहे.
रेल्वने आपल्या विभागात किमान 20 सेल्फी पॉइंट उभारावेत असे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले होते. प्रत्येक सेल्फी पॉइंटवर किमान एक-सवा लाख रुपये खर्च करावा असेही स्पष्ट केले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने आपल्या विभागांमध्ये सेल्फी पॉइंट उभारले खरे, पण ते कमी की काय म्हणून तब्बल सहा लाख रुपये खर्चून थ्रीडी सेल्फी पॉइंटही उभारण्याचे निर्देश बोर्डाकडून आले होते. त्यामुळे रेल्वे अधिकाऱयांनीही बोर्डाचे आदेश मानत मोठा खर्च करून सेल्फी पॉइंट फलाटावर, स्थानकात उभारले आहेत. मात्र त्याबाबत प्रवाशांची फारशी चांगली प्रतिक्रिया येत नसल्याने ते गुंडाळले आहेत. मध्य रेल्वेनेही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये चार-पाच सेल्फी पॉइंट थाटले होते; परंतु रेल्वेने ते आता गुंडाळून ठेवले आहेत. दरम्यान, सदरचे सेल्फी पॉइंट तात्पुरते असल्याने ते काढण्यात आल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
सेल्फीऐवजी विश्रांतीसाठी वापर
सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक नऊच्या समोर मध्य रेल्वेने थ्रीडी सेल्फी पॉइंट उभारला आहे. त्याच्यासमोर प्रवासी सेल्फी घेण्याऐवजी त्याच्या चौथऱयावर ठाण मांडून विश्रांती घेत आहेत. त्यामुळे हा सेल्फी पॉइंट आहे की विश्रांती कट्टा आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
























































