सेलू – पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणारे एटीएम मशीन चोरट्यांनी पळवले

686

वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील पोलीस स्टेशन जवळील हाकेच्या अंतरावर असलेले ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह पळवून नेले. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. गुरुवारी दुपारी एटीएममध्ये 10 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम टाकण्यात आली होती. त्यातून किती रकमेची निकासी झाली व किती रोख रक्कम एटीएम मध्ये शिल्लक होती हे मात्र कळू शकले नाही.

मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या डी.बी.पोलीस पथकाने मशीनचे फोटो काढले. त्यावेळी सर्व काही सुरळीत होते, मात्र सदरची घटना ही त्यानंतरच घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुख्य रस्त्यावरील संपूर्ण मशीनच पळवून नेल्याने शहरात मात्र प्रचंड खळबळ माजली आहे.

अमरावती जिल्ह्यात एटीएम मशीन फोडण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 10 दिवसांपूर्वी सेवाग्राम येथे एटीएम पळवून नेल्याची घटना घडली होती. आता सेलू मध्ये एटीएम मशीन काढून नेत सेवाग्राम येथील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पोलीस पेट्रोलिंग आणि पोलीस स्थानक हाकेच्या अंतरावर असताना एटीएम चोरीची घटना धक्का देणारी आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी पियुष जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे निलेश ब्राम्हणे यांच्यासह सेलु पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतू एटीएम समोर पाण्याचे डबके साचले असल्याने श्वान तिथेच घुटमळले. पोलीस या प्रकरणी आणखी शोध घेत असून आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या