विविध उपक्रमातून कोरोना बाधित रुग्णांना मानसिक बळ, सेलूचे कोविड सेंटर आदर्श

कोरोनामुळे रुग्णाची मानसिकता बदलते ही बाब लक्षात घेऊन येथील कोविड सेंटर मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी विविध उपक्रम राबवून कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक बळ देण्याचा सेलू पॅटर्न यशस्वीरित्या राबवणे सुरू केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम देखील प्रभावीपणे राबवणे शहरात सुरू झाले आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांमध्ये कोरोना विषयी भीती नाहीशी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढल्याने हा सेलू पॅटर्न यशस्वी होत असल्याची भावना निर्माण होत आहे. सेलू कोविड सेंटरचे जिल्हाभरात कौतुक देखील होत असून नुकतेच पालकमंत्री नवाब मलिक यांनीही सेलू कोविड सेंटरचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे सूचित केले होते.

या सेलू पॅटर्नमुळे काही दिवसांपूर्वी अंबड येथील रुग्णालयाची टीम सेलू उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन गेली आणि सेलू येथे चालणारे उपक्रम समजावून घेतले. पूर्वी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हे कोविड सेंटर होते. परंतु इतर जागेची कमतरता असल्याने तहसील रोडवरील शासकीय वसतिगृहात हे कोविड सेंटर हलविण्यात आले आहे. याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे हे दररोज स्वतः भेट देतात. या सेंटर मध्ये रुग्णांना पोषक व पूरक आहारासोबतच समुपदेशन, मार्गदर्शन केले जाते. प्रबोधनात्मक कार्यक्रम पाहण्यासाठी टी.व्ही. ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गितगायन, मार्गदर्शन यामधून कोरोना रुग्णाची मानसिकता सकारात्मक ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे हे स्वतः गितगायन करून रुग्णांना प्रोत्साहित करीत असतात. प्रत्येक रुग्णाच्या आहाराकडे देखील सर्व डॉक्टर लक्ष ठेऊन असतात. त्यासोबतच प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला देखील सर्व माहिती दिली जात असल्याने रुग्णांचा देखील कोविड सेंटरवर विश्वास दिसून येत आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असल्याने त्याच्याकडे सर्व टीमचे लक्ष असते.

दररोज सकाळी व सायंकाळी योगासने देखील घेतली जातात. यामुळे रुग्णांचे आरोग्य व प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत आहे. आतापर्यंत असंख्य कोरोना बाधित रुग्ण सेलूच्या कोविड सेंटर मधून बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम देखील प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे राबविली जात आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे, डॉ. संजय हरबडे हे स्वतः प्रत्येक वॉर्डात भेट देऊन नागरिकांना तपासणी करून घेण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या