
सामना ऑनलाईन । मुंबई
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सात जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गांधी-नेहरु घराण्याच्या अगदी जवळचा व्यक्ती संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य होत आहे. मुखर्जी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे योग्य नाही, असे मत ज्येष्ठ काँग्रेस नेते सी.के. जाफर शरीफ यांनी व्यक्त केले आहे. शरीफ यांनी या प्रकरणी मुखर्जींना पत्र लिहले आहे.
माजी केंद्रीय मंत्री जाफर यांनी मुखर्जींना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, ‘तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरला जाणार आहात हे समजल्यावर मला खूप आश्चर्य वाटले. आपल्या पक्षाने जातीय शक्तीच्या विरोधात नेहमी संघर्ष केला आहे. तुम्ही संघाच्या कार्यक्रमाला जाणार हे समजल्यावर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसलाय. त्यांचा तुमच्या या निर्णयाला विरोध आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असताना तुम्ही संघाच्या कार्यक्रमात जाणे योग्य नाही’.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त रविवारी उघड झाले. मुखर्जींच्या उपस्थितीवर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाने मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.




























































