ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. वेणीमाधव उपासनी कालवश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

55 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात यशस्वीपणे सेवा बजावल्यानंतर संन्यास घेणारे ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. वेणीमाधव उपासनी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. भागवत धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास करणारे डॉ. उपासनी यांनी अच्युतानंद सरस्वती हे नाव धारण केले होते. भगवद्गीतेच्या प्रचारासाठी त्यांनी आयुष्यभर प्रवचनांच्या माध्यमातून प्रबोधन केले. त्यांच्या निधनाने धार्मिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील प्रसन्न व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

डॉ. वेणीमाधव उपासनी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. डोंबिवलीच्या इंदिरा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शिवमंदिर मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. वैद्यकीय सेवा करतानाच डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांचे ते आधारस्तंभ होते. अच्युतानंद सरस्वती यांचा भागवत ग्रंथ मुखोद्गत होता. त्यांच्या तोंडातून भागवताची महती ऐकण्यासाठी भक्तगणांचा जनसागर लोटायचा. डोंबिवलीभूषण, धन्वंतरी पुरस्कार, समाजभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला होता.