
> राजेश पोवळे
मराठी साहित्याच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते, विचारवंत आचार्य डॉ. माधवराव पोतदार यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने वैचारिक चरित्रपर आणि ललित लेखनाच्या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ तेवणारा दीपस्तंभ निमाला आहे.
रायगड जिह्याच्या पेण तालुक्यातील रहिवासी असलेले डॉ. माधवराव पोतदार यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. साहित्यात डॉक्टरेट मिळवलेल्या डॉ. पोतदार यांनी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत मौलिक योगदान दिले. या काळात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलेच. परंतु विशेषतः शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या जवळपास दोन हजार महिलांना पदवीधर करण्याचे स्वप्न पूर्ण केले.
खंबीरपणे आणि स्वाभिमानाने कसे जगावे याचा डॉ. माधवराव पोतदार एक आदर्श वस्तुपाठ होते. गेली अनेक वर्षे ते संशोधनात व्यग्र होते. विविध विषयांवरील व्याख्याने देण्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्र पायाला भिंगरी लावून फिरले. विविध विषयांवर त्यांनी तब्बल 183 पुस्तके लिहिली. त्यात ‘मंत्र वंदे मातरम्’, ‘राम रंगी रंगले मन’ (रामदास), ‘चौदार तळे- एक मुक्तचिंतन’, ‘तेजाची आरती’, ‘डॉ. आंबेडकरांचे सखे-सोबती’, ‘राष्ट्रभक्तीची ज्वाला-सावरकर’, ‘आचार्य अत्रे-विनोद व तत्त्वज्ञान’, ‘पहिला राष्ट्रपुरुष-जगन्नाथ शंकरशेट’, ‘संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील शाहिरांचे योगदान’, ‘डॉ. आंबेडकरांच्या कार्यालय ब्राह्मणांचा सहभाग’, ‘अमरशेख-व्यक्ती वाङ्मय’, ‘मोठय़ांचे मोठेपण’ अशा असंख्य पुस्तकांचे लिखाण त्यांनी करून त्या व्यक्तिमत्त्वांचे अनेक अप्रकाशित पैलू जगासमोर मांडले. मुंबई विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ, जि. रायगड, येथे त्यांनी निमंत्रक म्हणून काम पाहिले. साहित्य संशोधन क्षेत्रातील सेवेबद्दल त्यांना ललित रंगभूमी-पुणे काव्यगौरव, आचार्य अत्रे काव्य पुरस्कार-मुंबई, एकता काव्य पुरस्कार-पुणे, किलातरंग काव्य पुरस्कार-जव्हार, एएफएसी कलामंदिर-चेंबूर-मुंबई, रायगड जिल्हा साहित्य संमेलनात साहित्य गौरव, महर्षी व्यास साहित्य पुरस्कार, रायगड मित्र पुरस्कार मिळाले. त्याशिवाय खोपोली नगरपालिका परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाजनवाडी ट्रस्ट मुंबई साहित्य सेवेबद्दल सुवर्णपदक, दैवज्ञ समाजाचे अधिवेशन-गोवा साहित्य सेवेबद्दल सन्मानचिन्ह, मुंबई विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळातर्फे समाजसेवा पुरस्कार, मुंबई दैवज्ञ साहित्य संमेलनाचे सन्मानचिन्ह, शाहीर साबळे प्रतिष्ठान-मुंबई लोकसाहित्य सेवेबद्दल सन्मानचिन्ह, मराठी लेखक साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक सन्मानचिन्ह, महाराष्ट्र शासन कला अध्यापक संघाचे गौरवचिन्ह असे सन्मानही त्यांना प्राप्त झाले.
पुण्यातील धनकवाडी येथील त्यांचे ‘स्वप्नपराग’ हे निवासस्थान म्हणजे ज्ञानमंदिरच बनले होते आणि डॉ. माधवराव पोतदार हे त्या ज्ञानमंदिरातील साहित्य साधनामग्न ऋषी.. वयाच्या 89 व्या वर्षांत एक तरुण साहित्यिकाला लाज वाटेल इतक्या तडफेने ते संशोधन करून नवनवीन पुस्तके वाचकांच्या भेटीसाठी आणत होते.
कोरोना काळात अवघे जग बंदिस्त झाले होते, परंतु माधवरावांनी संकटातही संधी शोधली. त्यांनी या काळात तब्बल 22 पुस्तकांचे लेखन केले. वयाच्या अखेरपर्यंत नित्य नवीन शिकण्याची त्यांना आस होती. त्यामुळे या वयातही ते आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करीत होते. वयाच्या 87 व्या वर्षी निसर्गोपचाराचे धडे घेऊन ते निसर्गोपचारतज्ञ बनले होते.
माधवरावांच्या या साहित्य यज्ञात पत्नी डॉ. मनीषा पोतदार, पुत्र पत्रकार पराग आणि सून प्रीती यांची खंबीरपणे साथ मिसळली. 16 एप्रिल रोजी त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. ते एक समृद्ध आणि यशस्वी जीवन जगले. सूर्य अस्ताला गेला म्हणजे तो काही खरंच बुडत नसतो, त्याप्रमाणे डॉ. माधवराव पोतदार देहरूपाने नसले तरी त्यांच्या लिखाणाचा आणि प्रेरणेचा झरा वाचकांना आणि ज्ञानार्थींना ऊर्जा देत राहील.



























































