7 लाख कोटींचा गल्ला एका तासात, शेअर बाजारात दिवाळी

309

मंदीसह जागतिक पातळीवरच्या घडामोडींचे पडसाद उमटून गेले काही दिवस नांगी टाकलेल्या शेअर बाजारात शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कॉर्पोरेट टॅक्समधील कपातीच्या घोषणेने दिवाळीचा माहोल संचारला.

सौदी अरेबियातील तेलसाठ्यांवर येमेन बंडखोरांनी केलेला हल्ला, कच्चा तेलाच्या आकाशाला भिडलेल्या किमती अशा वेगवेगळ्या घडामोडींनी शेअर बाजाराच्या मानगुटीवर बसून गेले काही दिवस गुंतवणूकदारांना कपाळावर हात मारायला लावला. याचवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. त्यांचे प्रयत्न शुक्रवारी कर कपातीच्या घोषणेनंतर फळाला आले.

सेन्सेक्सने दिवसभरात 2200 अंकांची उसळी घेतली. यापूर्वी 18 मे 2009 रोजी सेन्सेक्समध्ये 2111 अंकांची, तर निफ्टीमध्ये 713 अंकांची वाढ झाली होती.

शुक्रवारी निफ्टीने 600 हून अधिक अंकांची उसळी घेत 11300 चा पल्ला ओलांडला. सेन्सेक्सच्या सर्व 30 आणि निफ्टीच्या 50 पैकी 49 शेअर्समध्ये तेजी दिसली. इंडस्इंड बँक आणि मारुतीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक तेजी संचारली.

बीएसईच्या आकडेवारीनुसार अर्थमंत्री सीतारामन यांनी घोषणा केल्यानंतर लगेचच बाजाराला उभारी मिळाली. गुरुवारी 138.54 लाख कोटींच्या पातळीवर असलेल्या मार्केट कॅपिटलायझेशनने तासाभरातच 143.45 लाख कोटींवर झेप घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या