
सामना ऑनलाईन । मुंबई
जागतिक पातळीवर मंदीचे सावट असल्याने आंतराराष्ट्रीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्याचा परिणाम देशातील शेअर बाजारातही दिसत आहे. मंबई स्टॉक एक्सेंजमध्ये ( बीएसई) आज 350 अंकांची घसरण झाली. 11.15 वाजेपर्यंत 370 अंकांपर्यत घसरून निर्देशांक 37,793 वर आला होता, तर निफ्टीमध्ये 110 अंकाची घसरण होऊन निर्देशांक 11,347 पर्यंत खाली आला होता. बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात मोठी घसरण दिसून आली. 30 शेअरपैकी 27 शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.
एम अँड एम, एचडीसीएल, आरआयएल, येस बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँण्ड टी, टाटा मोटर्स, एसबीआय, टाटा स्टील, सन फार्मा, कोटक बँक आणि वेदांताच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. तर एनटीपीसी, ओएनजीसी, सीआयएल आणि मारुतीच्या शेअरमध्ये काही प्रमाणात तेजी होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजारात घरसण होऊन बाजार बंद झाला होता. त्यामुळे नव्या आठवड्यात बाजारात तेजी दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम देशातील बाजारावरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जपानच्या निक्कीमध्ये 2.9 टक्के, दक्षिण कोरियाच्या बाजारात 1.5 टक्के तर ऑस्टेलियाच्या बाजारात 1.3 टक्क्यांची घसरण दिसून आली.
शुक्रवारी 400 अकांची घसरण होऊन बीएसई 38,165 वर बंद झाला होता. तर निफ्टीमध्ये 64 अकांची घसरण होऊन तो 11,457 वर बंद झाला होता. या आठवड्यात बाजारात तेजी दिसली असती तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 40 हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, बाजारात घसरण झाल्याने या आठवड्यात 40 हजाराचा टप्पा पार करण्याचे स्वप्न भंगले आहे.






























































