अखेर ‘प्रायोगिक’ला हक्काचा रंगमंच मिळाला, पु. ल. देशपांडे अकादमीत कामाचा शुभारंभ

प्रायोगिक रंगभूमीसाठी हक्काचा रंगमंच मिळावा हे रंगकर्मींचे कित्येक वर्षांचे स्वप्न अखेर साकार होताना दिसत आहे. गेली सुमारे दहा वर्षे लालफितीमध्ये अडकलेल्या प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाच्या कामाचा आज शुभारंभ झाला. पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये रवींद्र नाटय़ मंदिराच्या पाचव्या मजल्यावरील जागेत हा सुसज्ज रंगमंच उभारला जाणार आहे. 391 आसन क्षमता असलेल्या रंगमंचावर येत्या जानेवारीत प्रायोगिक नाटकाचा पहिला प्रयोग रंगेल. रंगमंचावर रंगकर्मींना वर्षाला 200 प्रयोग अल्पदरात करता येतील.

प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

एखादा प्रकल्प लालफितीमध्ये अडकतो म्हणजे काय याचे हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. 2009 पासून ही जागा अशीच पडून होती. गेल्या दोन वर्षांत फाइलकर असलेले अनेक प्रशासकीय तांत्रिक अडथळे दूर करीत व नियम व कायद्याचे पालन करून प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाचा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करण्यात आला, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

राज्य सरकार आणि महापालिकांमार्फत नाटय़गृहे उभारली जातात. नाटय़प्रयोगाच्या भाडय़ांतूनच या नाटय़गृहांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल अशी सर्वसाधारण व्यवस्था आहे. पण नाटय़गृहांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य सरकार आणि महापालिका यांनीच दरवर्षी पुरेशी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. तशी तरतूद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

88 व्या वर्षी स्वप्न साकार होतंय – अरुण काकडे
वयाच्या 88 व्या वर्षी माझं स्वप्न साकार होतंय, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांनी व्यक्त केली. मी नाटय़संमेलनाध्यक्ष असताना काही मुद्दे मांडले होते. सांस्कृतिक धोरणाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात 150 आसनी नाटय़गृह असायला हवे, मात्र ते अजून झालेले नाही. मात्र प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच उभा राहतोय ही संकल्पना चांगली आहे, अशा भावना अरुण काकडे यांनी व्यक्त केल्या.

रंगमच असा असेल…
391 दर्जेदार आसने, डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर, आधुनिक तंत्रज्ञानाची प्रकाशव्यवस्था व ध्वनी व्यवस्था, ऍकॉस्टिक्स यंत्रणा, सुसज्ज मेकअप रूम, डिजिटल सिनेमा प्रोजेक्टरसाठी स्वतंत्र कक्ष, भव्य स्टेज, भव्य स्क्रीन व आधुनिक स्टेज ड्रेपरी, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतीक्षालय, दोन उद्वाहन, अग्निशमन यंत्रणा.

आपली प्रतिक्रिया द्या