नगर जिल्ह्यातील सात तालुके कोरोनामुक्त; प्रतिबंधात्मक उपाययोजनचे यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी सात तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही बाधित रुग्ण सापडला नाही. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर वेळीच जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तालुका स्तरावरसुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील 50 टक्के तालुके कोरोनामुक्त राहण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात पहिला करोनाबाधित रुग्ण 12 मार्चला सापडला होता. हा रुग्ण नगर शहरातील होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत होत्या. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आणि विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली. तालुका स्तरावरही आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा व एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा रुग्णवाढीचा ठरला. या काळात जामखेड, संगमनेर अशा तालुक्यांमध्येही रुग्ण आढळून आले. सध्याच्या परिस्थितीला तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 37 पर्यंत पोहोचली आहे. पण त्यातही दिलासादायक गोष्ट म्हणजे अद्यापही कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, अकोले या सात तालुक्यांमध्ये करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नियमित मास्कचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे अशा काही उपाययोजनांचा हा परिणाम आहे.

नगर, जामखेडमध्ये कोरोनाचे सर्वाधित रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत 37 करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वांत जास्त रुग्ण नगर व जामखेड या दोन तालुक्यांत सापडले आहेत. नगर तालुक्यात 11, जामखेड 11, संगमनेर 8, राहाता 1, नेवासे 4, कोपरगाव तालुक्यात 1 रुग्ण सापडला आहे. याशिवाय आष्टी (जि. बीड) येथेही एक रुग्ण करोनाबाधित सापडला असून, त्याच्यावर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोनाचे संक्रमण नसलेले तालुके

  • कर्जत
  • श्रीगोंदा
  • पारनेर
  • राहुरी
  • अकोले
  • शेवगाव
  • पाथर्डी