मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांचा अत्याचार

मानखुर्दमध्ये एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. 22 वर्षीय तरुणासह एका अल्पवयीन मुलाने हे घृणास्पद कृत्य केल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून लपून बसलेल्या दोन्ही आरोपींना पकडले.

मानखुर्द परिसरात राहणारी मुलगी खाऊ आणण्यासाठी  घराबाहेर पडली होती. तिला एकटीला बघून आरोपींची नियत फिरली. त्यांनी तिला मैदानात एका बाजूला नेत वासना शमवली. मुलीचे लैंगिक शोषण केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. अत्याचारामुळे मुलीला असह्य वेदना होऊ लागली. घरी गेल्यानंतर तिने पालकांना सांगितले. पालकांनी मुलीला लगेच खासगी दवाखान्यात नेले, मात्र तेथून कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचे निष्पन्न झाले. ट्रॉम्बे पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तत्काळ बलात्कार व ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करून अटक केली. अल्पवयीन मुलाची डोंगरीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली, तर दुसऱ्याला पोलीस कोठडी सुनावली.