
नितीन फणसे,[email protected]
नवी ओळख ललित साळवे… अनेक वर्षांच्या तगमग, तळमळी नंतर पुरुष होऊन स्वतःला हवी ती ओळख प्राप्त करून घेतली… लिंगबदल शस्त्रक्रियेविषयी थोडे सविस्तर…
साधारण तीन वर्षांपूर्वी उत्तर हिंदुस्थानात अजय पटेल नावाच्या तरुणाने स्त्री होण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांसारखे राहायला, वागायला त्याला आवडत होतं. त्यामुळे समाजात त्याला नावंही ठेवली जात. अखेर त्याने पूर्णपणे स्त्री होण्याचंच ठरवलं आणि एका स्वयंसेवी संस्थेद्वारे केंद्र सरकारकडे अर्ज केला आणि त्याच्यावर लिंगबदल शस्त्रक्रियाही पार पडली. आता तो पूर्णपणे महिला म्हणून जगतोय. लिंगबदल ऑपरेशन केल्यानंतर आता तो खूश आहे. आता तो आकृती पटेल या नावाने ओळखला जातो. त्यासाठी त्याला तब्बल ४ लाख रुपये खर्च आला. अगदी काल परवाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्य़ातील पोलीस शिपाई ललिता साळके यांच्यावर काही दिवसांपूर्वीच जननेंद्रिय शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. त्या मुलगा म्हणून जन्माला आल्या असल्या तरी अविकसित जननेंद्रियांमुळे मुलगी म्हणून वाढलेल्या ललिता यांना आता अखेर ‘ललित’ म्हणून नकी ओळख मिळणार आहे.
ललिता साळवे यांनी आपल्यावरील जननेंद्रिय शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी आपल्या खात्याकडे परवानगी मागितली होती. पण महिला असूनही पुरुष असल्याचा त्यांचा हा दावा खात्याला विचित्र वाटला. त्यामुळे त्यांना परवानगी दिली गेली नाही. मग मात्र ललिता यांचा ‘ललित’ बनण्यासाठीचा झगडा सुरू झाला. अखेर एक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर खास बाब म्हणून त्यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली. या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा सेंट जॉर्ज रुग्णालयात करण्यात आला. आता तीन महिन्यांनंतर साळवे यांच्यामध्ये शुक्राणूंची निर्मिती होते का याची तपासणी केली जाईल. त्यानंतर पुढील शस्त्रक्रिया करण्यात येतील. पुरुषांप्रमाणे दाढीमिशा येण्यासाठी पुढील काळात त्यांच्यावर केसरोपणही केले जाणार आहे.
लिंगबदल शस्त्रक्रिया ही एक किचकट प्रक्रिया आहे. यात तृतीयपंथीय व्यक्तीचे अवयव योग्य प्रकारे काम करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. त्यांना समाजात मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न केले जातात, असे हॉस्पिटल सूत्रांनी स्पष्ट केले. पुरुष बनण्याची इच्छा असलेल्या स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजांड, गर्भाशय क स्त्रीबीजवाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात येते. स्तनही काढले जातात. कृत्रिमरित्या लिंगही तयार केले जाते. वृषणामध्ये पुरुषबीज तयार होत नाहीत. लिंगातून मूत्रविर्सजन केले जाते परंतु लिंगाला नैसर्गिकदृष्ट़या उत्तेजना येत नाहीत. पुरुषांप्रमाणे दाढी, मिशी येण्यासाठी केश रोपणही केले जाते. व्यक्तीला हार्मेान्सची उपचार पद्धती दिली जाते.
दुसरीकडे काही पुरुषांना स्त्री बनण्याची इच्छा असते. अशा पुरुषांच्या शरीरातील लिंग, वृषण, वीर्यकोष शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढले जातात. काहीवेळा कृत्रिम स्तनही बसविले जातात. व्यक्तीवर हार्मेान्सची तसेच छातीवर किंवा चेहऱयावर केस येऊ नये यासाठी देखील उपचार केले जातात. मात्र गर्भाशय, स्त्राीबीजवाहिन्या व स्त्रीबीजांडे नसल्याने या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही. क्वचितवेळा बालकामध्ये मुलगा किंवा मुलीची जननेंद्रिये विकसित न झाल्याने मुलगा की मुलगी हा गोंधळ निर्माण होतो. सोनोग्राफी चाचणीद्वारे हे लगेचच पडताळता येते. बालकाच्या शरीरामध्ये गर्भाशय असल्यास ती मुलगी आहे हे नक्की होते.
ही शस्त्रक्रिया वेगळीच…
ललिता यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये लिंगबदल शस्त्रक्रियेतील पहिला टप्पा पार पडला आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कशी असते याविषयी हॉस्पिटलच्या सूत्रांकडून माहिती मिळवली. तेव्हा कळले की मुळात ललिता साळवे यांच्यावर झाली ती शस्त्रक्रिया लिंगबदलाची नाही. मुळातच त्या एक मुलगा म्हणूनच जन्माला आल्या होत्या. कारण जनुकीय तसेच गुणसूत्राच्या तपासण्यांमध्ये साळवे हे पुरुषच असल्याचे उघड झाले. त्यांच्यामध्ये महिलांप्रमाणे स्तन, अंडाशय हे अवयव नाहीत. फक्त त्यांची जननेंद्रिये अविकसित असल्याने ती स्त्रीप्रमाणे भासत होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया वेगळीच आहे, लिंगबदलाची नाही, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.

























































