
आदिवासीबहुल तालुका असलेल्या शहापूरमधील अतिदुर्गम भागात एसटीच्या फेऱ्या अचानकपणे बंद केल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज धसई येथे बससमोरच ठिय्या देत सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आमच्या बसेस पुन्हा सुरू करा अशी मागणी केली. तसेच एसटीच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाही दिल्या. बसच्या फेऱ्या बंद केल्या तर आम्ही जायचे तरी कसे, असा एकच सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.
फेऱ्या रद्द केल्याने संताप
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे ठाण्याचे असतानाही त्याच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महामंडळाच्या बेफिकीर कारभाराचा ‘प्रताप’ दिसून येत आहे. कोठारा या गावाकडे जाणारी दुपारी बाराची बस अचानक रद्द करण्यात आली. तसेच दिवसभरातील अन्य फेऱ्याही रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर दुपारी एक वाजता बस सोडली, पण गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये शिरताच आले नाही. त्यामुळे शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी एसटीसमोरच रस्त्यावर बसकण मांडली आणि आंदोलन केले.
शहापूरमधील अतिदुर्गम भागात असलेल्या गावपाड्यांमधून शेकडो विद्यार्थी शाळा व महाविद्यालयासाठी रोज बसने प्रवास करतात. पण काही फेऱ्या अचानक बंद केल्याने मुलांसह प्रवाशांचेही हाल होत असून या फेऱ्या त्वरित पूर्ववत कराव्यात. – रवींद्र लकडे, धसई विकास मंडळ अध्यक्ष.