Lok Sabha 2019 मुस्लीम तरुणाला जिवंत जाळणारा लढतोय लोकसभा निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मेरठ

लव्ह जिहादच्या संशयावरून एका मुस्लीम तरुणाला जिवंत जाळून त्याचा व्हिडीओ तयार करणारा नराधम शंभूलाल रेगर हा देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना या पक्षाकडून रेगर निवडणूक लढवणार असून त्याला पॅरोल मिळावा म्हणून पक्षाद्वारे अर्ज करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्यातून तो निवडणूक लढवणार असल्याचं उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सांगितले आहे.

डिसेंबर 2017 मध्ये राजस्थानात शंभूलालने मोहम्मद अफ्रझुल या बंगाली तरुणाची एका हिंदू तरुणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून जिवंत जाळून हत्या केली होती. त्याला जिवंत जाळतानाचा व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या प्रकरणी सध्या तो जोधपूरच्या तुरुंगात कैद असून त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे.

उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने हत्यांचे आरोप असलेल्या तिघांना उमेदवारी दिली आहे. यात दाद्री येथे गोंमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या झालेल्या मोहम्मद अखलाक याचा मारेकरी हरि ओम सिसोदीया याचा देखील समावेश आहे.