
क्रिकेटविश्वातील सर्वकालीन महान गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नवर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या अंत्यविधीसाठी शेन वॉर्नचे कुटुंबीय व क्रिकेटबरोबरच विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गजांसह हजारो चाहत्यांनी हजेरी लावून फिरकीच्या या जादूगारला अखेरचा अलविदा केला. वडिलांना अखेरचा सलाम करताना मुलगी समर वॉर्नला हुंदके अनावर झाले. यावेळी चाहत्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
52 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे 4 मार्च रोजी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. वॉर्नला बुधवारी मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन तसेच क्रिकेट जगतातील ब्रायल लारा, मार्क टेलर, अॅलन बॉर्डर, नासीर हुसेन यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. क्रिकेटपटूंसह चित्रपट क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी वॉर्नच्या आठवणी सांगितल्या. याचबरोबर रॉबी विल्यम्स, एड शिरीन व एल्टन जॉन यांच्यासारखे ग्लोबल सुपरस्टारही शेन वॉर्नला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी हिंदुस्थानचा विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा श्रद्धांजली व्हिडीओ दाखविण्यात आला. या श्रद्धांजलीमध्ये सचिनने आपल्या मित्राच्या आठवणी जागवल्या. 50 हजारांहून अधिक शेन वॉर्नचे चाहते या अंत्यविधीत सहभागी झाले होते.
अन् वॉर्नच्या मुलीला रडू कोसळले
वडिलांना श्रद्धांजली देताना वॉर्नची मुलगी समर जॅकसनला रडू कोसळले. ती म्हणाली, तुम्हाला आमच्यातून जाऊन 26 दिवस झाले. माझे तुमच्यावर किती प्रेम होते हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आठवणींच्या रूपाने तुम्ही आमच्यासाठी सदैव जिवंतच असाल, असे बोलताना समरला रडू कोसळले. समरसह ब्रूक व जॅक्सन ही शेन वॉर्नची मुलेही यावेळी उपस्थित होती.
राजस्थान रॉयल्सचा झेंडाही फडकला
शेन वॉर्नच्या अंत्यविधीच्या वेळी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा झेंडाही मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये फडकत होता. 2008 साली राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद शेन वॉर्नकडे होते. या हंगामात वॉर्नच्या नेतृत्वाखालीच राजस्थानने जेतपदावर नाव कोरण्याचा पराक्रम केला होता. याची आठवण म्हणून मेलबर्न स्टेडियमवर या संघाचा झेंडा लावण्यात आला होता.


























































