विक्रम लँडरचा शोध ‘या’ हिंदुस्थानी तरुणाने लावला, नासानेही दिले श्रेय

1893

चंद्राच्या पृष्ठभागावर ‘चांद्रयान 2’ च्या ‘विक्रम लँडर’चे अवशेष सापडल्याचा दावा अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) केला. लूनर रिकनेसन्स ऑर्बिटरला (LRO) विक्रम लँडरचे अवशेष सापडले आहेत, असे टि्वट नासाने केले. याचे काही फोटोही नासाने इस्रोला (ISRO) पाठवले असून यात विक्रम लँडरचे अवशेष चंद्रावर विखुरलेले दिसत आहे. याचे संपूर्ण श्रेय नासाने चेन्नईतील 33 वर्षीय मॅकॅनिकल इंजिनिअर शन्मूग सुब्रमण्यम उर्फ शान याला दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या या कार्याची माहिती दिली.

‘मंगळवारी सकाळी चार वाजता नासाकडून एक ई-मेल आला. नासाच्या लूनर रिकनेसन्स ऑर्बिटरचे (LRO) शास्त्रज्ञ जॉन कॅलर यांनी हा मेल मला पाठवला होता. यात त्यांनी विक्रम लँडरचे अवशेष शोधून दिल्याबद्दल माझे अभिनंदन केले’, असे शन्मूग सुब्रमण्यम याने सांगितले.

‘एलआरओच्या पथकाने तुमच्या शोधाला दुजोरा दिला आहे. तुमच्या सुचनेनंतर आमच्या पथकाने त्या स्थानावर अधिक शोध घेतला असता चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर कोसळल्यानंतरचे अवशेष दिसून आले. नासा याचे श्रेय तुम्हाला देते. या शोधासाठी नक्कीच तुम्हाला खूप वेळ आणि प्रयत्न करावे लागले असतील. तसेच याबाबतील तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी वेळ लागल्याबद्दल क्षमा करा, परंतु संपूर्ण छानणी केल्यानंतरच आपल्याशी संपर्क साधण्यात आला’, असे या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर शन्मूग सुब्रमण्यम याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर नासाचे पत्र जोडून ‘मी विक्रम लँडरचा शोध घेतला’, असे ट्वीट केले.

shan

16 दिवस फोटोचा अभ्यास
शन्मूग सुब्रमण्यम सांगतो, एलआरओने घेतलेल्या फोटोचा 17 सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान मी रोज अभ्यास करत होतो. दिवसातील जवळपास 4 ते 6 तास मी ते फोटो हाताळत होतो. इस्त्रोने ठरवलेल्या लँडिंग साईटपासून 750 मीटर अंतरावर मला एक पांढरा ठिपका दिसला, जो लँडिंगच्या तारखेला तिथे नव्हता. तो चमकतही होता. त्यावेळी मला तो विक्रमचाच तुकडा असावा अशी शंका आला. मी तात्काळ ट्वीट करून याच स्थानावर विक्रम लँडर चंद्राच्या मातीत ढिगाऱ्याखाली असावा अशी शक्यता व्यक्त केली. नासाच्या काही शास्त्रज्ञांना देखील मी ही माहिती पाठवली.

तो पुढे म्हणतो, मला नक्की विश्वास होता की मी त्याला (विक्रम) शोधले आहे, आणि याला आता नासाने देखील दुजोरा दिला आहे. नासाच्या एलआरओने 11 नोव्हेंबरला पाठवलेल्या नवीन फोटोंची डिसेंबर 2017 मध्ये काढलेल्या फोटोशी तुलना केल्यानंतर माझा शोध खरा असल्याचे सिद्ध झाले आणि मला याचे क्रेडिट मिळाल्याने मी आनंदी आहे. मी फक्त एक तुकडा शोधला, मात्र नासाने अन्य तीन तुकडे देखील शोधले.

नासाने दिले श्रेय
मंगळवारी नासाने विक्रम लँडर कोसळलेल्या ठिकाणाचे फोटो जारी केले. यात हिरव्या रंगालमध्ये विक्रम लँडरचा ढिगारा दाखवण्यात आला आहे, तर निळ्या रंगामध्ये विक्रम लँडर कोसळल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर काय बदल झाले हे दाखवण्यात आले आहे, तर ‘एस’ लिहिलेले स्थान म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या विक्रम लँडरच्या ढिगाऱ्याचा शोध शन्मूग सुब्रमण्यम याने लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या