शरद पवार, अण्णा हजारे यांना झेड सुरक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या सुरक्षा समितीने राज्यातील 90 हून अधिक मान्यवर व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यासह 45 जणांच्या सुरक्षेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे.

अलीकडेच शासनाच्या सुरक्षा समितीने 97 मान्यवर व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर समितीने 16 मान्यवरांच्या सुरक्षेचा दर्जा कमी केला तर 29 जणांची सुरक्षा कमी जास्त केली, तर अनेकांची सुरक्षा कायम ठेवली. ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांना असलेली एक्स दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, मात्र त्यांना घराबाहेर कुठेही जायचे असल्यास पोलिसांचे एक्सकॉर्ट देण्यात येईल असे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. याशिवाय ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची झेट प्लस दर्जाची सुरक्षा काढून त्यांना आता वाय दर्जाची तर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा काढून त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली. तसेच बीजेपीचे माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांच्या सुरक्षेतदेखील बदल करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून यापूर्वी त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती.

आणखी फेरबदल होणार
गेल्या सरकारमध्ये ज्या मंत्र्यांना सुरक्षा होती त्यात आवश्यकतेनुसार कपात करून नवीन सरकारच्या मंत्र्यांना ती सुरक्षा देण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.