
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या चौकशीप्रमाणे होऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास #CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2020
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. या विषयाला जोडून आणखी एक ट्विट करत पवार यांनी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या चौकशीची आठवण करून दिली. सीबीआय या प्रकरणाच्या तपासात सहा वर्षांनंतरही कुठल्याही निर्णयाप्रत येऊ शकलेली नाही. याकडे त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.
मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.
सीबीआयचे पथक मुंबईत दाखल
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) पथक आज मुंबईत दाखल झाले. याप्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे देण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना केली आहे. त्यानुसार सीबीआयचे पथक लवकरच या प्रकरणाची कागदपत्रे वांद्रे पोलिसांकडून ताब्यात घेणार असल्याचे कळते. यात सुशांतचा शवचिकित्सा अहवाल, न्यायवैद्यक प्रयोग शाळेने केलेला तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकार्डचा समावेश असणार आहे.
क्वारंटाइन नाही!
अभिनेता सुशांतिंसह राजपूतप्रकरणी तपास करण्यासाठी येत असल्याचे स्पष्टीकरण देत आम्हाला क्वारंटाइन करू नका, अशी विनंती सीबीआय अधिकार्यांनी केली आहे. त्यामुळे दिल्लीहून मुंबईत येणार्या अधिकार्यांना क्वारंटाइन करण्यात येणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.



























































