मला भीती दाखवू नका, तुमच्या ‘ईडी’ला ‘येडी’ बनवून टाकेन!

1344

सरकारी यंत्रणेचा वापर गुन्हेगारांविरोधात करण्याऐवजी विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून भीती दाखवत आहे. आता हे बस झाले. मला भीती दाखवू नका, तुमच्या ईडीला ‘येडी’ बनवून टाकेन असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत भाजप नेत्यांकडून होणाऱया टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवले जाते. गुन्हेगारांकर कारवाई न करता त्यांच्या विरोधात जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचे हत्यार वापरतात. या अशा कारवायांना मी घाबरणारा नाही. जे चुकते ते बोलतच राहणार, असे पवार म्हणाले.

मी मेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही
माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत, तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे. मात्र अशा कारवायांना घाबरायला मी मेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही हे लक्षात ठेवा, असे पवार म्हणाले.

शिवाजी महाराजांचा धडा पुस्तकातून काढण्याचे पाप
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याबाबत वक्तव्य केले आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याचे समोर आले आहे. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना ते काढण्याचे पाप हे सरकार करीत असल्याची टीका पवार यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या