संविधानाने दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची – शरद पवार

लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. लोकशाहीला आघात देणारी, मुलभूत अधिकार उद्ध्वस्त करणारी, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणाऱ्या विचारधारेचा पराभव करणं आणि या देशाच्या जनतेचं भविष्य हे योग्य राहील याची काळजी घेणं हेच काम आपल्याला करायचं आहे व त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक घटनेने तुम्हा आम्हाला दिलेले अधिकाराचे जतन करण्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा येथे म्हटले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेतून मार्गदर्शन करताना बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, आज देशाचं राजकारण आणि अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना जी काही शक्ती दिली गेली त्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून देशामध्ये अघोषित आणीबाणी बघायला मिळत आहे. इंडिया आघाडीची दिल्लीत सर्वच नेते रविवारी एकत्रित होते त्यावेळी आम्ही सर्वांनी मिळून रामलीला मैदानात शपथ घेतली की, या देशाच्या संविधानावर हल्ला होण्याची स्थिती आहे. त्यामधून देशातील कोट्यवधी लोकांची सुटका करायची असेल तर मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित राहणं आणि एक मोठी शक्ती दाखवून त्या माध्यमातून भाजप आणि भाजपच्या विचाराच्या लोकांचा पराभव करण्याचा निश्चय आम्ही सर्वांनी घेतला आहे असे शरद पवार म्हणाले.

वर्धा हे स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे. वर्धा येथे महात्मा गांधी यांचे वास्तव्य होते. या वास्तव्यामध्ये जो काही संदेश दिला आहे त्याचा स्मरण करणे आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिच्यावर मात करणे हे तुम्हाला आणि मला करायचं आहे. त्यासाठीच एक कर्तृत्ववान माणूस गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करत आहे. असा जागरूक उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पवार पक्षाच्या वतीने अमर काळे यांच्या रूपात देण्यात आला आहे. त्यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.