
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात याच आठवड्यात भेट झाली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंढरपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, राऊत यांनी सामनासाठी माझी पहिली मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे सांगितले होते. राऊत संपादक आहेत, त्यांना राजकीय मुलाखती घ्याव्या लागतात. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही.
यादरम्यान पवारांनी राज्यातील सरकार मजबूत आहे आणि ते पाच वर्षे टिकेल यात शंका नाही, असा पुनरुल्लेख केला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके माजी आमदार दीपक सांलुखे आदी उपस्थित होते.
मुळ विषय बाजूला पडून तपास भलतीकडेच…
सुशांत सिह आत्महत्येवर भाष्य करताना पवार म्हणाले, केंद्र सरकारला महाराष्ट्र पोलीस तपास करीत होते त्यावर त्यांना विश्वास वाटत नव्हता म्हणून त्यांनी दुसरी एजन्सी नेमली. या एजन्सीने नेमके काय दिवे लावले त्याचा प्रकाश तर अजून काही दिसत नाही. मुळ विषय बाजूला पडून तपास भलतीकडेच चालला आहे.



























































