#Corona शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्यात रंगला ‘सामना’, व्हिडीओ केला शेअर

4310

कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू असल्याने सामान्य लोकांसोबत मोठमोठ्या नेत्यांना देखील घरात खुर्ची टाकावी लागली आहे. देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने अनेक जण घरात, कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अनेकांनी पुस्तकात डोके खुपसले आहे, तर अनेकांनी बुद्धिबळाच्या पटावर डोके लढवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातही असाच एक ‘सामना’ रंगला. बाबासोबत बुद्धिबळ खेळतानाचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. राजकीय आखाड्यात भल्याभल्याना पाणी पाजलेल्या शरद पवार यांनी इथेही बाजी मारली.

पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे घरात बसून करायचे काय हा प्रश्न अनेकांना पडला आहे. नेते मंडळी देखील आपापल्या घरात बसून आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत आहेत. तसेच लोकांना घरात थांबण्याचे आवाहन करत आहेत. त्यासाठी अगदी किचनमधील व्हिडीओ, फोटोही शेअर करत आहेत. सुप्रिया सुळे यांनीही असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्या शरद पवारांसोबत बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत. मुलीला चेकमेट करतानाचा क्षण एन्जॉय करताना शरद पवार या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

‘#CoronavirusLockdown मुळे आम्ही सर्वजण घरात आहोत. आम्ही दुपारी बुद्धिबळाचा डाव मांडला. पण बाबांसोबत बुद्धिबळाचा डाव खेळणं सोपं नसतं. थोड्या वेळातच बाबांनी आम्हा मायलेकींना हरवलं, असं त्यांनी म्हटलंय. ‘आम्ही पुस्तकं वाचतोय, कुटुंबासोबत वेळ घालवतोय. तुम्हीही घरीच थांबा, सुरक्षित राहा,’ असा संदेशही त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

screenshot_2020-03-25-17-17-59-102_com-twitter-android

आपली प्रतिक्रिया द्या