
राज्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनता दरबार’ घेण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिले आहेत. पण आज शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचाच दरबार घेतला.
जनता दरबारात कोणत्या समस्या सोडवल्या, लोकांनी कोणत्या स्वरुपाच्या सर्वाधिक तक्रारी मांडल्या. त्या कशा पद्धतीने सोडवल्या अशी विचारणा शरद पवार यांनी मंत्र्यांना केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचा दररोज जनता दरबार बेलाँर्ड पियर येथील पक्ष कार्यालयात भरतो. या दरबारात राज्याच्या कानाकोपऱयातून असंख्य लोक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन दररोज येतात.
शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दोन बैठका आयोजित केल्या होत्या. एका बैठकीला सर्व मंत्री, लोकसभा व राज्यसभेचे खासदार उपस्थित होते, तर दुसऱया बैठकीला मंत्री, खासदार व पक्षाच्या सर्व फ्रंटचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकांमध्ये संघटनात्मक पातळीवर चर्चा झाली.
मंत्र्यांच्या बैठकीत शरद पवार यांनी जनता दरबारचा आढावा घेतल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मागील महिन्यापासून आयोजित केलेल्या जनता दरबारात कोणत्या समस्या सोडवल्या, त्याचे स्वरूप काय, जनता दरबारात लोकांनी मांडलेल्या तक्रारींचे पुढे काय झाले, अशी सर्व माहिती शरद पवार यांनी घेतल्याचे सांगण्यात येते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गृह मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार यांना मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्याची सवय आहे. मंत्री कार्यरत आहेत का, जनता दरबार कसा सुरू आहे याची माहिती ते वेळोवेळी घेत असतात तशीच माहिती त्यांनी आज घेतली, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

























































