LOK SABHA ELECTION 2019 : शरद पवार घेणार बुधवारी नगरचा आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या बुथ अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांशी बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधणार असून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे स्वत: या मेळाव्यास मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.

डॉ. सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा पातळीवर गतीमान हालचाली सुरू केल्या आहेत. नगरमधील मेळाव्यात पवार काय कानमंत्र देतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. सुजय विखेंच्या उमेदारीला शेवटपर्यत विरोध कायम ठेवत ही जागा राष्ट्रवादीच लढणार या भूमिकेवर पवार व त्यांचे सहकारी ठाम राहिल्याने सुजय विखे भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे आता विखेंच्या पराभवासाठी स्वत: पवारांनी लक्ष घातले असून कार्यकर्त्यासाठी बुधवारची चर्चा महत्वाची ठरणार आहे. नगर लोकसभा मतदार संघातील बुथ अध्यक्ष,पदाधिकारी यांनी स्वस्तिक चौकातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके यांनी केले.