शारदाश्रम विद्यामंदिरला युवासेनेचा दणका, ‘त्या’ विद्यार्थ्याला परीक्षा देता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फी भरली नाही म्हणून एका विद्यार्थ्याला ऑनलाईन परीक्षेची लिंक न पाठवता परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच युवासेनेने उघडकीस आणला होता. याप्रकरणी शाळेविरोधात महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर शाळेने त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्यास दिले आहे.

फी न भरलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरात घडला आहे. या विद्यार्थ्याच्या पालकांनी याप्रकरणी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडे शाळेविरोधात लेखी तक्रार केली आहे. चौथीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याच्या पालकांनी वर्षाची पूर्ण फी भरलेली नाही. यामुळे शाळेने या विद्यार्थ्याला परीक्षेलाच बसू दिलेले नाही. युवासेनेच्या या तक्रारीची दखल घेत शारदाश्रम विद्यामंदिरने माघार घेतली आहे तर शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.