ब्लॅक फ्रायडे! सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या आठवड्याचा शुक्रवार शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला आहे. देशांतर्गत व्यापारात गेल्या तीन दिवसात आलेली तेजी एका दिवसात घटली असून सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला आहे. निफ्टीची परिस्थिती वेगळी नाही.

SGX Niftyमध्ये होत असलेल्या 1 टक्का घसरणीमुळे आधीच या पडझडीचा अंदाज वर्तवण्यात येत होता. बाजार उघडण्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 480 अंकांनी घसरला होता. जसं बाजाराची सुरुवात झाली तसा सेन्सेक्स 636 अंकांहून अधिक घसरला आणि 58,300 अंकांवर स्थिरावला. याच पद्धतीने एनएसई निफ्टीमध्येही 200 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

काही वेळातच सेन्सेक्स अजून घसरला आणि सकाळी साडे दहाच्या सुमाराला 984 अंकांनी घसरून 58 हजारच्या खाली आला. निफ्टीत 1.50 टक्के घट झाली असून तो आकडा 17, 350 इतका झाला आहे.

दुसरीकडे झोमॅटो या फूड डिलीव्हरी कंपनीलाही नुकसान होत आहे. गुंतवणूकदारांना आपल्याकडे वळवण्यात ही कंपनी अयशस्वी झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीला 67 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. अर्थात हे नुकसान फिट्सोमधील आपल्या भागीदारीतल्या विक्रीतून मिळालेल्या 315.8 कोटींमुळे झालं होतं. पण, नंतर शुक्रवारी बाजार सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा स्टॉक विक्री सुरू केल्याने झोमॅटोच्या दरात नऊ टक्क्यांची घट होऊन तो आकडा 85.85 इतका खाली आला.