निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी आमच्या अपात्रतेची काळजी करू नये!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्हा कोणाचे यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाने पक्ष व चिन्ह आपल्यालाच मिळेल असा दावा केलेला आहे. एकीकडे कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे मिंधे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाकयुद्धही रंगले आहे. मिंधे गटाचे नेते महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार अपात्र होतील असा दावा केला होता, याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आम्ही शरद पवलार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी पर्वा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी आपच्या अपात्रतेची काळजी करू नये, असा टोलाही शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना लगावला.

आम्ही अपात्र होणार अशी स्वप्न पाहणारेच अपात्र होतील, अशी टीका महेश शिंदे यांनी केली होती. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, आम्ही शरद पवार यांच्या निष्टेपायी अपात्र झालो तरी आम्हाला त्याची पर्वा नाहीय. कारण त्यांच्यामुळे आम्ही राजकारणात आलो. त्यांच्यामुळे पद मिळाली. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही त्याग करायची भूमिका, तयारी आमची आहे.

ते पुढे म्हणाले की, जे निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेले आहेत त्यांनी आमच्या अपात्रतेची काळजी करू नये. त्यांनी त्यांच्या अपात्रतेची काळजी करावी. ते 100 टक्के अपात्र होणार आहेत. जरी दुर्दैवाने अपात्र झाले नाही तर जनतेच्या दरबारात मतदानावेळी ते अपात्र होतील हे मी जाहीररित्या सांगतो.

त्यांनी आमच्या अपात्रतेची काळजी करू नये. कारण आम्ही निष्ठावंत आहोत. निष्ठावंतांची त्याग करायची तयारी आहे. पण आपण पक्ष, निष्ठा सगळं बाजुला ठेऊन ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्या जनतेशी गद्दारी करून खोक्यासाठी तिथे गेलेले आहेत, असा टोलाही शशिकांत शिंदे यांनी लगावला. तसेच येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी प्रचंड ताकदीने उतरेल आणि विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.