शताब्दी नगरमधील झोपडीधारकांना धारावीतच कायमस्वरूपी घरे द्या!

शताब्दी नगरमधील झोपडीधारकांना तात्पुरत्या स्वरूपात पीएमजीपी कॉलनी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. भविष्यात या रहिवाशांना कायमस्वरूपी धारावीमध्येच स्थलांतरित करावे, या प्रमुख मागणीसाठी धारावी सेक्टर 5 पुनर्विकास कृती समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.

शीव येथील स्वामी श्री वल्लभदास मार्ग येथून हा मोर्चा किंग्ज सर्कल येथील धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या कार्यालयावर धडकला. विभागप्रमुख, आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास कृती समितीचे गणेश खाडे, अनिल म्हस्के, एन.बी.आर. कुमार, मारुती देसाई, सुरेश तुमेटी, सुभाष गांधले, महेंद्र वैती, नित्यानंद वडीवेल, संजय कांबळे, नाना आगवणे, नानासाहेब राऊत, प्रशांत खरात, राहुल कारंडे, चेतन थोरात आदी शिष्टमंडळने प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी सोमाणी यांना निवेदन दिले. लवकरात लवकर सेक्टर 5चा पुनर्विकास करण्यात यावा व विकास आराखडा जाहीर करावा, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.

प्रमुख मागण्या…

– धारावी सेक्टर 5 पुनर्विकास कृती समितीच्या वतीने 16 मे 2016 रोजी धडक मोर्चा काढण्यात आला होता, तेव्हा असे आश्वासन देण्यात आले होते की 2021 शेवटपर्यंत पुनर्विकासाचे काम पूर्ण केले जाईल; परंतु तसे झाले नाही. ते काम कधीपर्यंत पूर्ण करणार, त्या कामाचा कालावधी ठरविण्यात यावा. n प्रकल्प राबवताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन व स्थानिक रहिवाशांमधून समिती स्थापन करावी.