भाजपा म्हणजे वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी, शॉटगन पुन्हा धडधडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अभिनेता आणि नेता शत्रुघ्न सिन्हा यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. आपल्या खास शैलीत त्यांनी भाजप म्हणजे वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लगावला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सिन्हा हे उत्तम नेते आहेत; परंतु ते चुकीच्या पक्षात होते, असे म्हणत वेणुगोपाल यांनी त्यांचे स्वागत केले, तर सिन्हा यांनी राहुल गांधी हे उत्तम नेते असून हिंदुस्थानचा भविष्यातील चेहरा आहे. काँग्रेसची न्याय योजना अतिशय फायद्याची असून देशात अशा प्रकारची योजना यापूर्वी कधीही आणली केली नाही, अशा शब्दांत राहुल यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. भाजपात लोकशाहीला आणि नेत्यांना किंमत नाही. भाजपाने लोकांना दिलेली आश्वासने ते पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे जनताच त्यांना खाली खेचेल, असेही सिन्हा म्हणाले. मी जेव्हा सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा आवाज दाबण्यात आला. मला विश्वासघाती असे लेबल लावण्यात आले, असा आरोपही सिन्हा यांनी केला.

पाटणासाहिबमधून लढणार
काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर काही तासांतच बिहारच्या पाटणासाहिब येथून शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसचे उमेदवार असतील, असे काँग्रेसने जाहीर करून टाकले. सिन्हा यांच्या विरोधात भाजपाचे रवी शंकर प्रसाद रिंगणात असतील. याशिवाय काँग्रेसने हिमाचल प्रदेशचे माजी मंत्री रामलाल ठाकूर यांना हमिरपूर येथून उमेदवारी दिली आहे. ठाकूर आणि भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांच्यात लढत असेल.