दहावीची परीक्षा द्यायला गेली आणि लग्न करून आली !!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेला गेलेल्या एका विद्यार्थिनीला परीक्षा केंद्राबाहेर तिचा प्रियकर  भेटला. त्यावेळी परीक्षा देण्याऐवजी तिने प्रियकरासोबत लग्न केले आहे. परीक्षेला गेलेली मुलगी लग्न करून परतल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला आहे.

ही घटना येथील कटिहार गावातील मनिहारी पोलीस ठाणे भागात घडली आहे. पन्नालाल सुरेंद्र नारायण मध्य विद्यालयात ही घटना घडली आहे. गौरी ही विद्यार्थिनी या केंद्रावर दहावीची परीक्षा देत आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी ती परीक्षा केंद्रावर पोहोचली तेव्हा तिचा प्रियकर नितीश याच्याबरोबर तिची भेट झाली. नितीश कटिहारमधील गुजरा गाव येथे राहणारा आहे. गौरी परीक्षेपूर्वी फोनवरून नितीशबरोबर बोलायची. ती जेव्हा परीक्षेआधी नितीशला भेटली तेव्हा गावकऱ्यांनी त्या दोघांना पकडले, त्यावेळी त्या दोघांनी आपले एकमेकांवर प्रेम असून लग्न करणार असल्याचे गावकऱ्यांना सांगितले.

दोघेही लग्न करणार आहेत, हे कळल्यावर दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांना लग्न करण्यास विरोध केला. यावेळी मनिहारी  येथील पोलिसांनी या दोघांची गावातील लोकांपासून सुटका केली. त्यावेळी पोलिसांकडेही दोघांनी ‘आम्हाला लग्न करायचे आहे’, असा हट्ट धरला तसेच कुटुंबियांनी लग्नाला विरोध केला तर आत्महत्या करीन अशी धमकी गौरीने तिच्या पालकांनी दिली.

त्यामुळे पोलिसांनीच त्या दोघांचे लग्न जवळच असलेल्या एका शिवमंदिरात लावले. लग्नानंतर दोघांनीही पोलिसांचे आशीर्वाद घेतले. गेल्या चार वर्षांपासून गौरी आणि नितीश एकमेकांशी फोनवरून संपर्कात आहेत. एकदा राँग नंबर लागला आणि त्यांची ओळख झाली. त्यापूर्वी ते दोघेही एकमेकांना कधीही भेटले नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी गौरी आणि नितीशचे लग्न लावून दिल्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. आपण परीक्षा देऊ शकलो नाही याचे दु:ख या प्रेमी जोडप्याला आता झाले असले, तरी लग्न झाल्यामुळे ते दोघेही खूश आहेत. तसेच दोघेही कुटुंबियांनी आपल्याला स्वीकारावे यासाठी प्रयत्न करत आहेत.