बनावट अपंग प्रमाणपत्र बनविणारे दोघे जेरबंद, शेवगाव पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंध-अपंगांचे बनावट प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी कागदपत्रांसह जेरबंद केले आहे. शेवगाव पोलिसांनी शेवगाव-दादेगाव रोडवर ही कारवाई केली. राज्यभर यांचे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने लाभधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

संजय स्वरूप राजेभोसले (वय 62, रा. लांडेवस्ती, शेवगाव) व परमेश्वर भगवान बडे (मूळ रा. सामनगाव, हल्ली रा. मगरवस्ती, शेवगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेने शेवगाव तालुक्यातील बनावट प्रमाणपत्रांवर प्रकाश पडला असून, आरोपींनी आणखी कोणाला बनावट प्रमाणपत्र दिली आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

शेवगाव-दादेगाव रस्त्याच्या बाजूला टाटा इंडिगो मोटारीमध्ये एक व्यक्ती पैसे घेऊन अपंगांचे बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना समजली होती. त्यानंतर पोलीस अंमलदार नाकाडे, वीर बाबासाहेब शेळके, शिरसाट, बप्पासाहेब धाकतोडे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी मोटारीत संजय राजेभोसले आढळला. त्याच्याकडे महाराष्ट्र शासन लिहिलेले ओळखपत्र, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचा गोल शिक्का आणि अन्य कागदपत्रे आढळून आली. त्याच्याकडे चौकशी केली असता, परमेश्वर बडे याच्या घरी बनावट प्रमाणपत्र बनवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी बडे याच्या घरी छापा टाकला असता, तेथे विविध प्रकारचे शिक्के असलेली कागदपत्रे, कोरी ओळखपत्रे, अपंगासाठी लागणारे कोरे प्रमाणपत्र आढळून आले.

शेवगाव पोलिसांनी गुह्यात वापरलेली इंडिगो कार, कागदपत्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके करीत आहेत.

राज्यभरात रॅकेट असण्याची शक्यता

आरोपींकडे आढळलेल्या कागदपत्रांमध्ये धुळे, बीड, बुलढाणा, नगर जिल्हा समाजकल्याण अधिकारी, राज्य परिवहन आगार व्यवस्थापक यांच्या नावाचे शिक्के मारलेली कागदपत्रे, कोरी ओळखपत्रे आढळली आहेत. तसेच ढोरजळगाव, लाडजळगाव, शास्त्र्ााrनगर (शेवगाव), चऱहाट (ता. पाटोदा) शाळांचे शिक्के मारलेली कोरी कागदपत्रे आढळली आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर पसरली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.