धवनच्या जागी कोणाला लागणार जॅकपॉट? वाचा आयसीसीचे नियम…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असतानाच टीम इंडियाला तगडा झटका लागला. फॉर्मात असणारा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी वर्ल्डकपला मुकणार आहे. कदाचित संपूर्ण वर्ल्डकप तो बाहेर बसू शकतो. त्यामुळे आता त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळणार यावर चर्चा सुरू झाली आहे. श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या खेळाडूंच्या नावाची चर्चा सध्या रंगत आहे.

शिखर धवनच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्मासोबत लोकेश राहुल सलामीला येऊ शकतो. चौथ्या स्थानासाठी ऋषभ पंतच्या नावाचा सर्वात आधी विचार केला जाऊ शकतो असे क्रीडा विशेषत्ज्ञांचे मत आहे. पंतने आयपीएलमध्ये दणदार कामगिरी केली आहे. 16 लढतीत पंतने 488 धावा चोपल्या. परंतु त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव नाही. तो आतापर्यंत फक्त 5 एक दिवसीय लढती खेळला असून यात त्याने 93 धावा केल्या आहेत. 36 धावा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे.

पंतप्रमाणेच शिखरच्या जागी श्रेयस अय्यरच्या नावाचीही चर्चा आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवलेल्या अय्यरने 16 लढतीत 463 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे. पंतप्रमाणे त्यालाही आंतरराष्ट्रीय एक दिवसीय लढतींचा जास्त अनुभव नाही. अय्यरने आतापर्यंत 6 लढती खेळल्या असून यात 210 चोपल्या आहेत. यात त्याचा सर्वाधिक स्कोर 88 धावा आहेत.

आयसीसीचे नियम काय सांगतात
आयसीसीच्या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूच्या बदल्यात पर्यायी खेळाडूची निवड तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होईल. त्यामुळे टीम इंडियाला याबाबत विचार करावा लागणार आहे. धवनच्या जागी पंत किंवा अय्यरचा समावेश झाला तर धवन संपूर्ण स्पर्धेला मुकेल. त्याची दुखापत किती गंभीर आहे यावर सर्व अवलंबून असणार आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत बीसीसीआय याबाबत निर्णय घेईल अशी आशा आहे. तसेच बदली खेळाडू न घेता टीम इंडिया खेळली तर लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामीला येईल आणि चौथ्या स्थानावर दिनेश कार्तिक किंवा विजय शंकर खेळताना दिसेल.