
सध्याचा काळ हा मार्केटिंगचा आहे. आपण केलेल्या, न केलेल्या कामाचा कसा बडेजाव करायचा ते बघितले जाते. अशा वेळी ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्यासारखी माणसं, ज्यांनी निरपेक्ष भावनेने रंगभूमीची सेवा केली, ती अगदी हिमालयासमान भासतात. मोहनदास सुखटणकर यांनी दीर्घ अनुभवाचं गाठोडं पाठीशी असूनही सदैव विद्यार्थी बनून शिकणं पसंत केलं. नव्या पिढीच्या पाठीवर कौतुकानं थाप देण्याची आणि माणसं जोडण्याची कला त्यांनी शेवटपर्यंत जपली. ही भूमिका सगळय़ांनाच करता येईल असे नाही. पाच दशकांहून अधिकच्या कारकीर्दीतील आठवणी आणि किस्से यांचा मोठा खजिना त्यांच्याकडे होता. भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यातील माणिकमोती दिल्याशिवाय त्यांनी कधी रित्या हाताने पाठवले नाही.
मोहनदास सुखटणकर यांनी नोकरी सांभाळून आपले रंगभूमीचे वेड जोपासले. ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. 1955 ते 2005 या काळात ते संस्थेत कार्यरत होते. त्यांनी कलाकार म्हणून संस्थेत काम करायला सुरुवात केली असली तरी कार्यकर्ता म्हणून काम करण्यास प्राधान्य दिले. संस्थेचे दरवर्षी एक नाटक यावं आणि ‘शो मस्ट ऑन’ यासाठी पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असायची. प्रयोगाचं व्यवस्थापन, तिकीट विक्री, कधी प्रॉम्प्टर तर कधी सहनायक अशी सर्व कामे ते करायचे. अख्खं नाटक त्यांना तोंडपाठ असायचे. त्यांच्या काळात संस्थेने 50 नाटकांची निर्मिती केली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गा’, ‘मत्स्यगंधा’ अशी कितीतरी नाटकं गाजली. काही जुनी नाटकं नव्याने आणली. ‘मरणात खरोखर जग जगते’, ‘युद्धस्य रम्य कथा’ या दोन्ही नाटकांमध्ये ते प्रमुख नायक होते. जयवंत दळवींच्या ‘स्पर्श’मधील त्यांची भूमिका गाजली. संस्थेच्या नाटकाचे जे काही 10 हजार प्रयोग झाले, त्यातील चार-साडेचार हजार प्रयोगात सुखटणकर यांनी काम केले. त्यातील हजारभर प्रयोगात त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून काम केले. कुणी कलाकार आला नाही की ते ऐनवेळी उभे राहायचे.
त्यांनी ‘नटसम्राट’मध्ये सगळय़ा भूमिका केल्या, फक्त नटसम्राट सोडून… ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वगळता त्यांनी सर्व भूमिका केल्या. एकदा ऐनवेळी संभाजीराजे साकारले. ‘मस्त्यगंधा’मध्ये तर ऐनवेळी चंडोल उभा केला. ‘लेकुरे उदंड झाली’ हे पहिले मराठी व्यावसायिक नाटक घेऊन ते अमेरिकेत गेले. कोणतंही मानधन न घेता ते संस्थेसाठी काम करत राहिले. सुखटणकर यांनी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले, पण त्यांची नाळ रंगभूमीशी जोडलेली होती.
मी संस्थेचं कोणतंही मानधन घेतले नाही तरी संस्थेमुळे मला माणसांचे अपार धन मिळाले, असे ते नेहमी सांगायचे. कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य अशा अनेक साहित्यिकांचा सहवास त्यांना लाभला. त्यांना कविताही तोंडपाठ असत. कुसुमाग्रजांवर त्यांचे नितांत प्रेम होते. त्यांनी शशी मेहता यांच्यासोबत ‘शब्दकळा कुसुमाग्रजांच्या’ हा कार्यक्रम केला आणि तो चांगलाच गाजला.
वयाच्या नव्वदीनंतरही सुखटणकर यांचा उत्साह, तल्लख बुद्धिमत्ता तरुणांना लाजवेल अशीच होती. ‘नटसम्राट’ची स्वगतं खणखणीत आवाजात ते म्हणायचे. ‘नटसम्राट’ची भूमिका करायची राहून गेली. पुनर्जन्मावर विश्वास आहे. पुन्हा जन्माला आलो, तर रंगभूमीचा विद्यार्थी म्हणूनच येईन आणि ती राहून गेलेली इच्छाही पूर्ण होईल, असे ते म्हणायचे.
सुखटणकर म्हणजे ‘दी गोवा हिंदू’च्या रौप्य महोत्सवापासून शताब्दी महोत्सव बघणारे कार्यकर्ते. आज 100 वर्षे पूर्ण झालेल्या या संस्थेत नाटय़ विभाग जवळजवळ बंद पडल्यासारखाच आहे. सगळय़ा संस्थेला संजीवनी मिळावी, असे त्यांना मनोमन वाटायचे. ‘जीव ओतून काम करणारी माणसे मिळत नाहीत. वेळ मिळाला तर काम करू असं म्हणतात, पण आम्ही वेळच घालवायचो तिथे.’ हा नव्या-जुन्यातील फरक ते सांगायचे. त्यांच्यातील निरलस कार्यकर्ता, कलावंताला सलाम!
>> शिल्पा सुर्वे