भूमिकांची निवड महत्त्वाची – शिल्पा तुळसकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मेघ दाटले’ या मालिकेनंतर जवळपास 20 वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा तुळसकर झी मराठीवरील आगामी ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहेत. सध्या या मालिकेचे प्रोमोज टीव्हीवर झळकत असून शिल्पा आणि स्वप्नील जोशी यांची जोडी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकप्रिय कलाकारांच्या मालिकांना प्रेक्षकांची आपसूकच पसंती मिळते, या गोष्टीचा विचार न करता चांगल्या भूमिका निवडणं आणि त्यांना न्याय देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं, असे शिल्पा तुळसकर यांनी सांगितले.

मालिकेतील भूमिकेविषयी शिल्पा म्हणाल्या, ‘मधल्या काळात अनेक मालिकांमध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे, बऱयाच वर्षांनी या मालिकेतून मी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. मालिकेच्या कथानकाविषयी त्या म्हणाल्या, ‘सौरभ आणि अनामिकाच्या अव्यक्त प्रेमाची ही गोष्ट आहे. 20 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येतात आणि त्या काळात दोघांच्याही आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. अशा वेळी सौरभला त्याचं प्रेम मिळणार की ‘शेवटपर्यंत प्रेम करायचं राहून गेलं’ हीच भावना सौरभसोबत राहणार, या प्रश्नाची उत्तर या मालिकेतून मिळतील.’