
राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडल्याने शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात वर्णी लागेल या आशेने शिंदे गटातील खासदार दिल्लीकडे याचकासारखे डोळे लावून बसले आहेत. पण केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकार मंत्रिमंडळ विस्तार करणार नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे खासदार सध्या गॅसवर आहेत.
शिंदे गटातील खासदारांना केंद्रीय मंत्रीपदाचे गाजर दाखवले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील एक-दोन खासदारांच्या गळय़ात केंद्रीय मंत्रीपदाची माळ घालणार अशाही पुडय़ा सोडल्या जात आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपदाच्या आशेवर असलेले शिंदे गटातील खासदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण आता केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे वृत्त आहे. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार हे स्पष्ट होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आशेवर असलेल्या शिंदे गटाच्या खासदारांमध्ये धाकधूक वाढली आहे.
आमदारांतही अस्वस्थता
राज्यातील मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. आता केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अठरा मंत्र्यांच्या जिवावर राज्याचा कारभार सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे गटातील इच्छुक आमदार अस्वस्थ आहेत. पण दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या ‘पुडय़ा’ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील इच्छुकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.




























































