
पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना मिळविण्यासाठी मिंधेंच्या युवासेनेच्या जिल्हाध्यक्षाने चक्क स्वतःच्या मोटारीवर गोळ्या झाडल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. ही घटना 19 मे रोजी वारजे माळवाडी भागात घडली होती. याप्रकरणी सचिन गोळे, शुभम खेमनार आणि अजय ऊर्फ बगली सकपाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार संकेत मातले हा फरार असून, वारजे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. नीलेश राजेंद्र घारे असे गोळीबाराचा प्लॅन केलेल्या जिल्हाध्यक्षाचे नाव आहे.
पुणे जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश राजेंद्र घारे याच्या कारवर अज्ञाताने 19 मे रोजी मध्यरात्री 12च्या सुमारास वारजे माळवाडी भागात गोळीबार झाला होता. घारे याचे येथील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय असून, तो कार्यालयात सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला. सुदैवाने घारे हा गाडीत नव्हता. याप्रकरणी वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाला गती दिली. रविवारी (दि. 25) रात्री उशिरा वारजे पोलिसांनी वारजे भागातून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, नीलेश घारे यानेच गोळीबार करायला
लावल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला.
घारे याने याआधी वारजे पोलीस ठाण्यात शस्त्र परवाना मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. शस्त्र परवाना मिळावा, तसेच जिल्हाध्यक्ष असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी त्यानेच हा गोळीबार घडवून आणला आहे. स्वतः नीलेश घारे याने स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव रचल्याची माहिती पोलीस तपासातून उघडकीस आली आहे. पोलीस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा, यासाठी स्वतःच्या गाडीवर त्यानेच गोळीबार घडवून आणला होता. घारे याच्या गाडीवर गोळीबार झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.