
सरकारकडून होणारी फसवणूक आणि मतचोरी याबद्दल विरोधी पक्षाप्रमाणे आता सत्ताधारी आमदारही महायुती सरकारवर जाहीर टीका करू लागले आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या दोन आमदारांनी या मुद्दय़ावरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे सरकारबद्दलचा रोष आणि संताप केवळ जनतेमध्येच नव्हे तर सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींमध्येही असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
महायुतीच्या एक वर्षाच्या काळात फुटकी कवडीही मिळाली नाही
पाचोरा येथे झालेल्या एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजप सरकारवर जाहीर टीका केली. महायुतीच्या एक वर्षाच्या काळात शिंदे गटाच्या आमदारांना फुटकी कवडीही मिळाली नाही, असा आरोप पाटील यांनी केला.
वर्षभरात एक कवडीही न मिळाल्याने आमदारांना फक्त पालकमंत्र्यांकडून मिळणा ऱ्या जिल्हा नियोजनाच्या निधीचा सहारा आहे, पण आता अतिवृष्टीमुळे वर्षभर तरी कामे काढता येणार नाहीत, असे पाटील म्हणाले. महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा योजना बंद केली नसती तर अतिवृष्टीग्रस्त शेतक ऱ्यांना सरकारकडे हात पसरण्याची गरज पडली नसती, असे ते म्हणाले.
मतदार याद्यांमध्ये घोळ… आयोगाला लाज वाटली पाहिजे
मतदार याद्यांमधील घोळावरून विरोधी पक्षांचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, पण आता सत्ताधारीही उघडपणे बोलू लागले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार याद्यांमधील अफरातफरीवरून निवडणूक आयोगाची आज लाजच काढली.
बुलढाण्यात आधीच 20 ते 22 टक्के मतदान होते. त्यात मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, 20 ते 30 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या लोकांची नावेही मतदार यादीत आहेत, बरोबरच अनेक नगरसेवकच मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार घुसवत आहेत, त्यामुळे चांगले लोक निवडून येत नाहीत, निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे, अशी टीका गायकवाड यांनी केली.


























































