
माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या हेरिटेज दर्जा असलेल्या मुख्यालयाची शिंदे गटाकडून तोडफोड करण्यात आली आहे. हेरिटेज कमिटीची कोणतीही परवानगी न घेता मुख्यालयाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामांमध्ये आधुनिक साहित्याचा वापर झाल्यामुळे हेरिटेज नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हेरिटेज मुख्यालयाची तोडफोड झाल्याप्रकरणी बेजबाबदार मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
माथेरानमर्धाल जुन्या शासकीय व बिगरशासकीय वास्तू या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेरिटेज कमिटीच्या देखरेखीखाली येतात. अशा वास्तूंची कोणतीही दुरुस्ती, डागडुजी किंवा नूतनीकरण करण्यासाठी संबंधित हेरिटेज कमिटीची पूर्वपरवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र नगर परिषद कार्यालयात विनापरवानगी काम सुरू असल्याचा आरोप शिवराष्ट्र पॅनलचे गटनेते सीताराम कुंभार यांनी केला आहे. नुकतीच नगर परिषदेची निवडणूक पार पडून शिंदे गट-भाजप महायुतीची सत्ता आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हेरिटेज कार्यालयात नूतनीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या कार्यपद्धतीवर इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे मौन
याप्रकरणी गटनेते सीताराम कुंभार त्यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेऊन या कामासाठी हेरिटेज कमिटीची परवानगी आहे का, नगर परिषदेच्या सभागृहाचा ठराव झाला आहे का, तसेच टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे का, असे प्रश्न उपस्थित केले. मात्र याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी कोणतेही उत्तर न देता मौन पाळले. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काम बंद न करता राजरोसपणे सुरू ठेवले जात आहे.
चौकशी करण्याची मागणी
मुख्यालयाच्या नूतनीकरणाचे हे काम अद्याप सुरूच असून मुख्याधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष अभय असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. हेरिटेज दर्जाच्या वास्तूमध्ये मनमानी पद्धतीने नूतनीकरण केल्यास माथेरानच्या ऐतिहासिक ओळखीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही सीताराम कुंभार यांनी केली आहे.


























































