
बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱया तरुणाची चारजणांनी हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल ‘पॅलेसिअस’जवळ घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकेसाठी मृताच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. राजेंद्र आंतवन धिवर (वय 40, रा. राजगुरूनगर, शिर्डी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संजय पवार यांनी फिर्याद दिली आहे.
राजेंद्र धिवर हा साईबाबा संस्थानमध्ये कंत्राटी कामगार होता. मात्र, सध्या काम नसल्याने तो मित्र संजयसह सेंट्रिंगच्या कामाला जात होता. मंगळवारी सायकलवरून घरी येत असताना दमल्याने दोघे हॉटेल पॅलेसिअसच्या पटांगणात बसले होते. याच वेळी दोन दुचाकींवरून चारजण तेथे आले. त्यातील एकाने धिवरकडे काडीपेटी मागितली.
धिवरने सायकलच्या सीटवर काडीपेटी ठेवली. मात्र, काडीपेटी लवकर न दिल्याचा राग आल्याने त्यातील एकाने राजेंद्रवर धारधार शस्त्राने वार केले. आरडाओरडा ऐकून लोक मदतीला धावल्याने आरोपींनी पळ काढला. जखमी अवस्थेत धिवर याला साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.


























































