साई संस्थानातील 588 कंत्राटी कर्मचारी कायम, नियुक्तीपत्रेही मिळाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साई संस्थानातील 588 कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत सामावून घेण्यात आले आहे. या कामगारांना गुरुवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांच्या स्वाक्षरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली.

राज्य शासनाने गेल्या सप्टेंबरमध्ये संस्थानातील 635 कंत्राटी कामगारांना संस्थान सेवेत घेण्यास अनुमती दिली होती. मात्र या कामगारांना आदेश देणे प्रलंबीत होते. साडेतीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर गुरुवारी यातील 588 कामगारांना संस्थान प्रशासनाने नियुक्तीचे आदेश दिले.

शासनाच्या परवानगीने 2008 मध्ये संस्थान सेवेतील 2000 पूर्वीच्या 1052 कर्मचाऱ्यांना कायम केले होते. 2004 मध्ये शासनाने संस्थान आपल्या अधिपत्याखाली घेतले. त्या पार्श्वभुमीवर कायदा लागु होण्यापुर्वीच्या म्हणजे ऑगस्ट 2004 पूर्वीच्या 635 कामगारांना कायम करण्यास डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. सप्टेंबर मध्ये राज्य शासनाकडून 635 कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत घेण्यास अनुमती मिळाली. मात्र विधानसभा निवडणुक आचारसंहिता व त्यानंतर कामगारांच्या कागदपत्रांच्या छाननीत बराच कालावधी उलटल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली होती.

गेल्या काही दिवसांपासुन प्रशासन यासाठी पूर्णवेळ काम करत होते. अखेर गुरुवारी या कामगारांची प्रतिक्षा संपली. 635 पैकी काही कामगार मयत झाले तर काही नोकरी सोडून गेलेले आहेत.काहींच्या कागदपत्रांची शहानिशा किंवा ते असलेल्या सेवा कालावधीची पडताळणी अस्द्यापही सुरू असल्याचे सांगण्यात येते. छाननीनंतर यातीन अनेक कर्मचाऱ्यांनाही नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी नियुक्तीपत्रे मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला.